Thursday, March 19, 2009

१, विजयपथ ते शिवसेना भवन, व्हाया मोतीबाग

“महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण शिवसैनिकच असतो. त्यामुळे हो, मी आजपासून शिवसैनिक झालो.”, अविनाश धर्माधिकारी यांनी ‘स्टार माझा’ला फोनो देताना असं म्हटलंय. मला एक वाक्य या निवडणुकीच्या काळात निलेश राणे, माणिकराव ठाकरे यांच्या तोंडून ऐकायला मिळालं, ते आठवलं. ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो’ हे ते वाक्य. सध्या या वाक्याला ‘राजकारणात कधीही, कुणीही कुठल्याही विचारधारेचा, पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नसतो’, असंही घेता येईल असं वाटू लागलंय. धर्माधिकारींच्या शिवसेना प्रवेशानंतर तर नक्कीच. उद्या येनकेन प्रकारेण जर अविदा भाजपात किंवा संघात गेले, तर ते कदाचित असेही म्हणू शकतील की, हिंदुस्थानात
जन्मणारा प्रत्येकजण स्वयंसेवकच असतो. देशाची सेवा करणारा तो स्वयंसेवक. होय, मी स्वयंसेवक आहे. इथे मुळात एक प्रश्न मनात येतो, की ‘शिवसैनिक’ हे जे संबोधन शिवसेनेतच वापरले जाते, त्या शिवसेनेच्या पक्षीय, वैचारिक आणि कार्यपद्धतीच्या संदर्भांसकट सर्व महाराष्ट्रीय स्वत:ला ‘शिवसैनिक’ म्हणवतील का? फार दूरची बात सोडा पण, ‘चाणक्य मंडल’चे किती विद्यार्थी स्वत:ला ‘शिवसैनिक’ म्हणवून घेतील ? (यापुढे ‘चाणक्य मंडल’च्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा की नाही, हेही आत्ताच ‘शिवसैनिक’ धर्माधिकारी यांनी जाहीर करावेच!)
धर्माधिकारींबद्दल असं वाटायचं कारण म्हणजे, ज्या नैतिक पायाच्या राजकारणाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केलाय, त्याच्या विरूद्ध प्रवास करत त्यांनी आपल्याच प्रतिमेला छेद दिलाय. धर्माधिकारी यांनी जेव्हा प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला, तेव्हाच राजकारणात जायचे त्यांनी निश्चित केले होते. मुळातली संघ परिवाराची पार्श्वभूमी आणि त्यातच तत्कालीन लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे पुण्यात तिकिट मिळण्याचे त्यांना मिळालेले आश्वासन, जे पूर्ण झाले नाही म्हणून ते नंतर अपक्ष उभे राहिले. यामुळे धर्माधिकारी यांनी मुळात तेव्हाच आपल्याला आता ‘राजकारण’ करायचंय हे मनाशी पक्क केलं असतं, तर नंतर आपल्या राजकीयदृष्ट्या बदललेल्या प्रत्येक निर्णयाचं अपुरं समर्थन करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. कारण, एकदा ‘राजकारण’ करणार आहे असं स्पष्ट झालं की, लोकही आपल्या नेत्या, नायकाकडून जो त्याग ते करू शकत नाहीत त्यांची मागणी करीत नाहीत. संधीसाधू राजकारणाचे हे प्रच्छन्न समर्थन कुणास वाटेलही, ते तसंच आहेही. (याच राजकारणाचा तर धर्माधिका-यांनी वेळोवेळी धिक्कार केला!) कारण, मग धर्माधिकारींनी ज्यांना नेहमीच शिव्या घातल्या, ज्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंतांची ‘प्रकरणं’ माहित असल्याचा त्यांचा दावा होता, ज्या पक्षाच्या लोकांची अवैध, अनैतिक कामं करणार नाही म्हणून ते त्यांना थेट ‘मातोश्री’वर जायचेही आव्हान ते देत. (..आणि हे किस्से साप्ताहिक बौद्धिकात सांगायचे). त्याच एकाधिकारी शिवसेना पक्षात ‘शिवसैनिक’ म्हणून जायची वेळ त्यांच्यावर आली नसती.
धर्माधिकारी हे मूलत: स्वच्छ चारित्र्याचे बुद्धिमान व्यक्ती आहेत. आभाळाएवढं काम करण्याची हुशारी, क्षमता, दृष्टी त्यांच्याकडे आहे, पण अनेक वेळा अशा कामांसाठीचा धूर्त, कावेबाजपणा, क्रूरपणा (शक्य असूनही) त्यांच्याकडे नाही वा त्यांनी तो स्वत:त बाणू दिला नाही. म्हणून तर नेहरू युवा केंद्राचे संचालक असताना त्यांचं आणि तत्कालीन युवक कल्याण मंत्र्यांचं पटलं नाही, आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. म्हणूनच, जिथं अशा प्रकारची वृत्ती हेच अस्तित्वाचं भांडवल आहे, त्या पक्षात धर्माधिकारीजी तुमचा निभाव लागेल का? प्रसंगी ज्या ‘मातोश्री’चा आदेशही धुडकावण्याचा नैतिक माज तुम्ही दाखवला असता, तो आता दाखवू शकाल का? जो पक्ष हिंदुत्वाचं निव्वळ भावनिक राजकारण करतो, तिथं थेट अजेंडा घेऊन काम करणारे तुम्ही रमाल का हो?

जाता जाता एक. आपल्या बोळक्याचं गूढ निष्पाप हसू चेह-यावर ठेवणा-या, विवादांच्या पुढे जाऊन ज्यांचं महात्म्य तुम्हीच सांगितलं त्या मोहन महात्म्याला आता विसरा. तुमच्या सध्याच्या पक्षाला आवडणारा नवा गांधी तुमची वाट पाहतोय.....

यतो यत समिहसेततो नौ अभयंकुरू
शन्न: कुरू प्रजाभ्यो, भयं न पशुभ्य:

सर्वकाळ सर्व शुभेच्छा...

प्रसन्न जोशी

Monday, March 9, 2009

मुस्लिमांचा मतदानाचा फतवा आणि ब्राह्मण

नुकतीच बातमी वाचली की, देशातल्या मुसलमानांपैकी बहुसंख्यांचे प्रतिनिधीत्व करणा-या काही शिखर संस्थांनी मुसलमानांनी मतदान करावे असा फतवा किंवा सूचना जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात, मुसलमानांनी इस्लामच्या दृष्टीने निवडणुकांकडे बघू नये, आणि म्हणूनच फक्त विशिष्ट पक्षाला किंवा धर्मिय उमेदवाराला मत देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केलीये. त्याही पलिकडे जाऊन, मुस्लिमांनी मुळात मतदान करावे याचा आग्रह धरण्यात आला आहे. आता असे फतवे बजावून विशिष्ट वर्गाला काही करण्यास सांगणे हेच मुळात खटकण्याजोगे आहे. त्यातही मतदान ही एकाचवेळी सार्वजनिक आणि वैयक्तिक बाब! यासाठी प्रबोधन जरूर व्हावे. पण, प्रबोधनात वैयक्तिकता, मतभेदांना जागा असते. ती अशा 'फतवा' सिस्टीममध्ये मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे जरी हे फतवे चांगल्या हेतूने आणि त्यातही मुसलमानांचा धार्मिक घट्टपणा पाहता, काहीशा उदारवादी भूमिकेतून जाहीर झाले असले, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. पण, किमान पक्षी जर मुसलमानांच्या धार्मिक शिखर संस्था धर्मापार विचार करण्याची भाषा करत असतील, तर त्यांचं स्वागतच आहे.
इथे मला या घटनेची तुलना पुण्यातल्या 'बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशना'शी करावीशी वाटते. यातल्या अनेक (प्रतिगामी) ठरावांपैकी एक म्हणजे, ब्राह्मणांचे हित जपणा-या पक्षास, उमेदवारास मतदान करताना प्राधान्य द्यावे. (याच अधिवेशनात स्व-जातीय विवाह करण्याविषयीही एक ठराव झाला. मात्र, परशुरामाची आई रेणूका क्षत्रिय होती, हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. असो, तो वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे.) हे मान्य, की मेंदूंपेक्षा डोक्यांचे महत्व जास्त झालेल्या आजच्या लोकशाहीत, त्यातही महाराष्ट्रात पॉलिटिकली ब्राह्मणां स्थान आणि फायदे मिळत नाहीत. पण, म्हणून ब्राह्मणांचे हित पाहणा-यास मते द्यावीत. इतका प्रच्छन्न संकुचितपणा जाहीरपणे दाखवला जाणं खटकणारे ठरते. असाच ठराव जर मुसलमानांनी केला असता, तर टीकेचा आगडोंब उसळला असता. माझ्या या मतावरही जी रिझर्व्हेशन्स मांडली जाऊ शकतात, त्यांची मला कल्पना आहे. पण, ज्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची नवी पिढी पारंपरिक क्षेत्रांना त्यजून नवनव्या क्षेत्रात जातेय, त्यांना पुन्हा संकुचित राजकीय व्यवहारांत अडकवण्याचा प्रयत्न का व्हावा? हाच प्रश्न आहे. सध्या जातींच्या टोकदार गणितांची हवा गरम आहे. मान्य. पण, म्हणून जातीजातीचेच हितसंबंध पहायचे, मग पुरोगामी म्हणजे नक्की काय ते तरी या 'पुरोगामी' राज्याने ठरवायला हवे. मुस्लिम जसे धार्मिक अल्पसंख्य तसे ब्राह्मण जातीय अत्यल्पसंख्य. या नात्याने का होईना पण, ब्राह्मणांचे हित
पाहणा-यांना मतदान करा, असे म्हणणारे मुस्लिमांच्या या फतव्याचा विचार करतील का?

-प्रसन्न जोशी

Tuesday, March 3, 2009

ब्लॉग एक विद्रोही माध्यम....

आतापर्यंतचा मीडिया हा एक ते अनेक असा होता, आहे. मात्र, ब्लॉग हाच असा एकमेव मीडिया आहे जो एकाचवेळी सर्वांचा सर्वांसाठी अशा स्वरूपाचा आहे. यामुळे माध्यमाच्या मालकीमुळे येणारा माध्यमाच्या प्राप्तीचा अडसर दूर झाला आहे.विशेषत: यात दृक्-श्राव्य आणि लिखित अशा सर्व प्रकारांतील कंटेंट प्रकट करता येत असल्याने, या तीन्ही प्रकारांतील माध्यमांची शक्ती ब्लॉगने आपल्याला देऊ केलीये. त्या अर्थाने प्रस्थापित आणि पारंपरिक माध्यमांना पर्याय उभे करणारे ब्लॉग हे विद्रोही माध्यम आहे, असे मला वाटते.आता कोणालाही आपल्या मतासाठीवृत्तपत्रांवर पूर्ण विसंबून राहण्याची गरज नाही...आता कोणासही आपले म्हणणे ऐकवण्यासाठी रेडिओवर स्पेस विकत घेण्याची गरज नाही...आता चॅनल्सच्या ऐवजी तुम्हीचदाखवा, काय दाखवायचंय ते...या माध्यमाच्याही मर्यादा आहेत.पण, प्रस्थापित माध्यमापेक्षा यातअसणारा वाव महत्वाचा.मला ब्लॉग हे मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचे प्रभावी माध्यम वाटते. ब्लॉगमुळेमराठी साहित्य जगभरात सहज पोहोचेल.ग्रामीण, उपेक्षितांच्या अभिव्यक्तीला कुठल्याहीमध्यस्थाची गरज भासणार नाही.या क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. आम्ही काही मंडळी यात काही, काही करत आहोत.तुम्ही किमान एक करा....स्वत:चा ब्लॉग सुरू करा. त्यात लिहा,चित्र दाखवा, ऑडिओ क्लिप ऐकवा, व्हिडिओ दाखवा. काहीही करा. पण करा.कुणी उत्तमोत्तम साहित्य मराठीतून ब्लॉगवर आणावं, कुणी चांगल्या फोटोंचं कलेक्शन द्यावं, कुणी जंगल, प्राणी वाचवण्याची मोहिम हाती घ्यावी हे अन् असं काहीही करा पण करा.